इंग्लंड दौऱ्यासाठी
खो-खोला सहाय्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी केंद्र सरकारने खो-खो संघाला हिरवा कंदिल दाखविला आहे. सरकारने ही मंजुरी दिली आहे, याचा अर्थ सरकारकडून या संघाचा खर्च केला जाणार आहे. खरे तर खो-खो हा इतर खेळांत समाविष्ट होतो, ज्यांना सरकारकडून अनुदान दिले जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी होताना सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. पण, देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नियमात शिथिलता आणून सरकारने खो-खोला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल किंवा ऑलिंपिकमध्ये खो-खोचा समावेश करण्यासाठी खो-खो संघटकांना एक आधार मिळणार आहे.