अ‍ॅपशहर

मालीचे खेळाडू २३ वर्षांखालील

फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालीकडून १-५ असा पराभव पत्करल्यानंतर इराकचे प्रशिक्षक काहतम चिथर यांनी सनसनाटी आरोप केला आहे. माली संघ हा १७ नव्हे तर २३ वर्षांखालील मुलांचा वाटतो, असे काहतम म्हणाले आहेत.

Maharashtra Times 19 Oct 2017, 4:00 am
वृत्तसंस्था, मडगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mali players are under 23 blames iraqi coach
मालीचे खेळाडू २३ वर्षांखालील


फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालीकडून १-५ असा पराभव पत्करल्यानंतर इराकचे प्रशिक्षक काहतम चिथर यांनी सनसनाटी आरोप केला आहे. माली संघ हा १७ नव्हे तर २३ वर्षांखालील मुलांचा वाटतो, असे काहतम म्हणाले आहेत. मालीविरुद्धच्या एकतर्फी उपउपांत्यपूर्व झुंजीत इराकचा निभाव लागला नाही. या निमित्ताने मालीच्या धष्टपुष्ट, धिप्पाड खेळाडूंकडे पाहून हे खेळाडू १७ वर्षांखालील वाटत नसल्याचा साक्षात्कार इराकला झाला.

‘आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की, मालीच्या खेळाडूंचा दर्जा वरचा आहे; पण जेव्हा शारीरिक क्षमतेची बाब पुढे येते तेव्हा ते या १७ वर्षांखालील वयोगटाचे वाटतच नाहीत. आफ्रिकन संघ आणि इतर संघ यांच्या शारीरिक क्षमतेत बरीच मोठी तफावत दिसते. म्हणूनच मी म्हणतो की ते २३ वर्षांखालील खेळाडू वाटतात. आफ्रिकन संघांतील १७ वर्षांखालील खेळाडूंची तुलना इतर देशांच्या खेळाडूंशी होऊच शकत नाही’, असे इराकचे प्रशिक्षक काहतम म्हणतात. याबाबत अधिकृत तक्रार मात्र ते करणार नाहीत. यामुळे इराकला पराभव पचवता आलेला नाही, हे दिसून येते.

त्यांची ही नाराजी सहाजिकच मालीचे प्रशिक्षक योनास कोमला यांना पटलेली नाही. या सगळ्यासाठी विशेष नियम असून वय तपासण्यासाठी फिफाकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, तेव्हा इराकने पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा, असे योनास यांनी सांगितले.

ही बाब फिफा अधिकाऱ्यांच्या कानावरही घालण्यात आली अन् त्यांनीही इराकचे प्रशिक्षक काहतम यांच्याबाबत नाराजीचा सूर लावला. जर त्यांना याबाबत आक्षेप होता, तर त्यांनी सामन्याआधीच ही बाब नजरेस आणून द्यायला हवी होती, असे फिफा अधिकारी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज