अ‍ॅपशहर

सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात कोळी सज्ज

अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियातील जवळपास सगळे प्रमुख समुद्र आणि सामुद्रधुनी पोहून जाणाऱ्या २० वर्षीय प्रभात कोळीच्या या कामगिरीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली. त्याला राष्ट्रीय क्रीडादिनी तेन्झिंग नॉर्गे हा साहसी खेळासाठी दिला जाणारा पुरस्कार देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आता अमेरिकेच्या मॅरेथॉन स्वीमिंग फेडरेशनने निश्चित केलेल्या सात आव्हानात्मक समुद्रातील सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात सज्ज आहे.

महाराष्ट्र टाइम्स 10 Sep 2019, 10:06 am
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Prabhat-Koli


अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियातील जवळपास सगळे प्रमुख समुद्र आणि सामुद्रधुनी पोहून जाणाऱ्या २० वर्षीय प्रभात कोळीच्या या कामगिरीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली. त्याला राष्ट्रीय क्रीडादिनी तेन्झिंग नॉर्गे हा साहसी खेळासाठी दिला जाणारा पुरस्कार देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गेल्यावर्षी त्याने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज केला होता, पण त्याला हा पुरस्कार मिळाला नाही. यावेळी थेट केंद्राचाच पुरस्कार मिळाल्यामुळे राज्य शासनही प्रभातच्या या कामगिरीची दखल घेईल अशी आशा आहे. आता अमेरिकेच्या मॅरेथॉन स्वीमिंग फेडरेशनने निश्चित केलेल्या सात आव्हानात्मक समुद्रातील सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात सज्ज आहे.

अवघ्या २०व्या वर्षी प्रभातने जगातील सात आव्हानात्मक समुद्रांपैकी सहा समुद्र पोहून पार केले आहेत. इंग्लिश खाडी (३६ किमी, १३ तास १४ मि. २०१५), कॅटलिना (अमेरिका, ३४ किमी, १० तास १३ मि. २०१६), कैवी (हवाई, ४२ किमी, १७ तास २२ मि. २०१७), सुगारू खाडी (जपान, ३० किमी, ९ तास ५२ मि. २०१७) नॉर्थ चॅनल (नॉर्थ आयर्लंड, ३४ किमी, २०१८), स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर (स्पेन, १५.२ किमी, ४ तास २२ मि. २०१९) असा त्याचा सागरी जलतरणातील अभिमानास्पद प्रवास आहे. त्यातील कैवी आणि सुगारू चॅनल पोहताना त्याने तरुण आणि वेगवान जलतरणपटू म्हणून स्वतःचा ठसा उमटविला आहे. नॉर्थ चॅनल पोहोणारा तो जगातील सर्वात लहान आणि आशियातील वेगवान जलतरणपटू ठरला आहे. आता सात समुद्र ओलांडण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला कूकची सामुद्रधुनी पार करायची आहे. पुढील वर्षी २२ किमीची ही सामुद्रधुनी पार करण्याचे आव्हान पेलण्यासाठी तो न्यूझीलंडला जाईल.

प्रभातच्या या प्रवासात त्याच्या आईवडिलांनी बराच संघर्ष केला आहे. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला प्रभातही शेवटच्या वर्षाला शिकत असतानाही आपल्या या स्वप्नासाठी कसून मेहनत घेत आहे. 'पोहायला सुरुवात केली तेव्हा कोणी माझी दखल घ्यावी, मला यश मिळेल की नाही याचा विचार केला नव्हता हा पुरस्कार मिळाल्यावर त्याचा अभिमान आईवडिलांच्या डोळ्यात पहायला मिळतोय याचा आनंद वाटतो आहे,' असे प्रभात म्हणतो.

इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार प्रभात खुल्या पाण्यात पोहण्याचा सराव करतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज