अ‍ॅपशहर

पाचव्या प्रो कबड्डीची चढाई

प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाला आजपासून हैदराबाद येथील गच्चीबौली स्टेडियममधील लढतींनी होत आहे. या लढतींपैकी यजमान तेलुगू टायटन्स आणि चेन्नई थलैवा या सलामीच्या लढतीपेक्षा चाहत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची लढत असेल ती यू मुम्बा आणि पुणेरी पलटण या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली.

Maharashtra Times 28 Jul 2017, 3:32 am
हैदराबाद : प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाला आजपासून हैदराबाद येथील गच्चीबौली स्टेडियममधील लढतींनी होत आहे. या लढतींपैकी यजमान तेलुगू टायटन्स आणि चेन्नई थलैवा या सलामीच्या लढतीपेक्षा चाहत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची लढत असेल ती यू मुम्बा आणि पुणेरी पलटण या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pro kabaddi will start from today
पाचव्या प्रो कबड्डीची चढाई


पाचवा हंगाम हा प्रो कबड्डी लीगला वेगळ्या स्तरावर नेणारा आहे. हा हंगाम तब्बल १३ आठवडे चालणार असून त्यातील अनुप कुमारची यू मुम्बा आणि दीपक निवास हुडाची पुणेरी पलटण ही डर्बी पहिल्या दिवशी पाहायला मिळेल. यू मुम्बाने एकदा विजेतेपद पटकावून दोनवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुणेरी पलटणने गेल्या वर्षी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे या संघांतील लढत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या हंगामातील सलामीची लढत तेलुगू टायटन्स आणि नवखा संघ तामिळ थलैवा यांच्यात होणार आहे. वर्ल्डकप कबड्डीत चमकलेल्या अजय ठाकूरच्या नेतृत्वाखालील तामिळ संघ विजयी सलामी देतो का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

यंदाच्या हंगामात तब्बल १३८ सामन्यांची मेजवानी चाहत्यांना मिळेल. त्यात गुजरात फॉर्च्युन जायन्टस, तामिळ थलैवा, हरयाणा स्टीलर्स, उत्तर प्रदेश योद्धा असे चार नवे संघही समाविष्ट झाले आहेत.

एकूण संघ १२. या लीगसाठी दोन स्वतंत्र विभाग आहेत.

अ विभाग : दबंग दिल्ली, जयपूर पिंक पँथर्स, पुणे पलटण, यू मुम्बा, हरयाणा स्टीलर्स, गुजरात फॉर्च्युनजायन्टस.

ब विभाग : तेलुगू टायटन्स, बेंगळुरू बुल्स, पटना पायरेटस, बेंगाल वॉरियर्स, यूपी योद्धा, तामिळ थलैवा.

प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी तीनवेळा झुंजणार आहे. प्रत्येक संघाच्या १५ लढती होतील.

प्रत्येक विभागातील तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेतेपदासाठी त्यांच्यात चुरस असेल.

२८ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ही लीग चालणार आहे.

२० ऑक्टोबरपर्यंत लीग सामने होतील आणि २२ ऑक्टोबरला क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ अशा २३ ऑक्टोबरला क्वालिफायर ३ आणि एलिमिनेटर १ अशा लढती मुंबईत होतील. चेन्नईत एलिमिनेटर २ लढत २६ ऑक्टोबरला होणार असून अंतिम लढत २८ ऑक्टोबरला चेन्नईतच होईल.

-हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, कोलकाता, हरयाणा, रांची, दिल्ली, चेन्नई, जयपूर, पुणे या ठिकाणी लढती होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज