अ‍ॅपशहर

पुणे मॅरेथॉन विजेत्यांचा बक्षिसासाठी नऊ महिने संघर्ष

पैसे जमा केल्याचा आयोजकांचा दावा; अपरिहार्य कारणामुळे पैसे रखडलेmaheshvichare@timesgroup...

Maharashtra Times 22 Sep 2018, 3:51 am
mahesh.vichare@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune marathon winners get award after 9 months
पुणे मॅरेथॉन विजेत्यांचा बक्षिसासाठी नऊ महिने संघर्ष

mvichareMT

यावर्षी २ डिसेंबरला पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन होत असल्याची घोषणा नुकतीच केली गेली असली तरी गेल्यावर्षीच्या मॅरेथॉनमधील पुरुष विजेत्यांचे पैसे नऊ महिने झाले तरी मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले, मात्र हे पैसे त्यांच्या खात्यात शुक्रवारी जमा केल्याचा दावा पुणे मॅरेथॉनचे विश्वस्त अभय छाजेड यांनी केला आहे. आरटीजीएसद्वारे हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती छाजेड यांनी दिली. एकूण २३ धनादेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३ डिसेंबरला पुणे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमधील विजेता इथियोपियन खेळाडू बेशा गेटाच्यू (१ लाख ७५ हजार) तर द्वितीय क्रमांकावरील खेळाडू झालेलाम लेमा (१ लाख ५० हजार) यांचा समावेश त्यात होता. बेशाने २ तास १५ मिनिटे वेळ नोंदविली होती. गेल्या वर्षी शर्यतीला अॅथलेटिक्स फेडरेशनची मान्यता नसल्यामुळे हे पैसे मिळण्यास विलंब झाला आणि त्याचा फटका या खेळाडूंना बसल्याचेही दिसते आहे.

पुणे मॅरेथॉनमध्ये जे इथियोपियाचे खेळाडू सहभागी झाले होते, त्यांचा समन्वयक म्हणून अलेमू हा काम करत होता. डिसेंबरला मॅरेथॉन झाल्यानंतर पैसे जमा झाले नाहीत म्हणून तो १९ मार्चला पुण्यात दाखल झाला, पण मार्च अखेरपर्यंत इथे थांबूनही तांत्रिक कारणामुळे त्याला पैसे मिळू शकले नाहीत. २८ मार्चला त्याला पुणे पालिकेकडून धनादेश मिळाल्याचे त्याने 'मटा'ला दिलेल्या माहितीत सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो इथियोपियाला रवाना झाला. ११ एप्रिलला त्याने ते इथियोपिया मध्ये जमा केले, पण तिथे ४५ दिवसांचा अवधी लागेल असे सांगितल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागली. सप्टेंबर महिन्यापर्यंतही त्याचे पैसे जमा झाले नव्हते. शेवटी त्याने हे पैसे आपल्याला मिळणार नाहीत, असे गृहित धरले होते.

शर्यतीत सहभागी होणार नाही

आपले खेळाडू या मॅरेथॉनमध्ये पैसे कमावण्यासाठी भाग घेतात. ते अत्यंत गरीब घरातले असतात आणि कशीबशी पैशांची व्यवस्था करून आम्ही शर्यतीत सहभागी होत असतो. पैसे वेळेत न मिळाल्याने आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, असे शर्यतीचे नियोजन असू नये, आम्ही या शर्यतीत सहभागी होणार नाही, मी खूप दुःखी आहे, अशी भावना अलेमूने 'मटा'कडे व्यक्त केली.

ज्या खेळाडूंचे पैसे मिळाले नव्हते, त्यात बेकेले अबेबे (पाचवा क्रमांक, पूर्ण मॅरेथॉन १ लाख १५ हजार), गॅलेन जेनबेल (अर्धमॅरेथॉन, पाचवा क्रमांक ७० हजार रु.), बायसा अशेनेफी (अर्ध मॅरेथॉन, नववा क्रमांक ५० हजार रु.), किंदू तिरुनेश (नववा क्रमांक पूर्ण मॅरेथॉन ७५ हजार रु.) आदिंचा समावेश आहे.

मॅरेथॉनला फेडरेशनची मान्यता

दरम्यान, या मॅरेथॉनला भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनची मान्यता असल्याचे स्पष्टीकरण फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी केले. यावेळी नियमानुसार वेळेत ही परवानगी घेतल्यामुळे आम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे, असे सुमारीवाला यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी या मॅरेथॉनला फेडरेशनने मान्यता दिली नव्हती.

पुणे महानगरपालिकेकडून तेव्हा पैसे मिळायला थोडा वेळ लागला. त्यावेळी शर्यतीला मान्यता नसल्यामुळे कदाचित. शर्यतीत सहभागी झालेल्या एका गटाचे २३ धनादेश होते तर एकाचे १२-१३. त्यांनी इथियोपियन बँकेत धनादेश भरले. त्यांनी आयसीआयसीआय बँकेला कळविले की, ते पैसे आमच्याकडे जमा करा म्हणून. पण ते काही होऊ शकले नाही. तेव्हा ते पुन्हा धनादेश घेऊन आले होते. आता आम्ही ते आरटीजीएस करून पैसे जमा केले आहेत. त्यामुळे आम्ही पैसे दिले नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे.

- अभय छाजेड, विश्वस्त, पुणे मॅरेथॉन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज