अ‍ॅपशहर

मुंबईच्या रिदमचा दहाव्या वर्षी 'एव्हरेस्ट विक्रम'; ठरली पहिलीच भारतीय...

मुंबईच्या वांद्रे येथील एमईटी ऋषीकुल विद्यालयात शिकणारी रिदम मामनिया या १० वर्षीय मुलीने एव्हरेस्ट शिखराचा बेस कॅम्प सर केलाय. इतक्या लहान वयात अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 11:44 am
मुंबई: मुंबईतील वरळीत राहणाऱ्या दहा वर्षीय रिदम मामनिया (rhythm mamania) या मुलीने ‘एव्हरेस्ट’ शिखराचा बेस कॅम्प (everest base camp) सर करण्याचा विक्रम केला आहे. रिदमने ५३६४ मीटर उंचीला गवसणी घातली असून, इतक्या लहान वयात ही उंची सर करणारी ती पहिलीच भारतीय आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rhythm Mamania
रिदम मामनिया


रिदम मामनिया ही वांद्रे येथील एमईटी ऋषीकुल विद्यालयात पाचव्या इयत्तेत शिकते. तिच्या या साहसावेळी तिचे आईवडील हर्षल आणि उर्मी, हेदेखील सोबत होते. हे गिर्यारोहण महिनाभराचे होते. त्यापैकी बेस कॅम्पचा ट्रेक हा ११ दिवसांचा होता. रिदमचे गिर्यारोहण सोपे नव्हते. बेस कॅम्प ट्रेकदरम्यान रिदम वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितीत दररोज आठ ते नऊ तास चालत असे. त्यामध्ये अनेकदा गारपीट, हिमवादळे व हिमवृष्टीदेखील होत असत. उणे १० अंश सेल्सिअस तापमान असे. मग त्यातही हिकमतीने वाटचाल करीत तिने विक्रमाला गवसणी घातली.

वाचा- सौरव गांगुलीने खरेदी केले नवे घर; किंमत ऐकूण हैराण व्हाल

रिदम मामनिया ही प्रत्यक्षात स्केटिंग खेळाडू आहे. ‘स्केटिंगसोबतच गिर्यारोहण ही माझी आवड आहे. अशाप्रकारच्या या ट्रेकने मला एक जबाबदार गिर्यारोहक बनणे आणि डोंगरावरील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवले’, असे ती म्हणाली. रिदमला वयाच्या पाचव्या वर्षापासून पर्वतारोहणाची आवड होती आणि तिचा पहिला लांबचा २१ किमीचा ट्रेक हा गोवा-कर्नाटक सीमेवरील दूधसागर हा होता. तेव्हापासून तिने माहुर्ली, सोंडई, कर्नाळा आणि लोहगड यासारख्या सह्याद्री पर्वतरांगांमधील काही शिखरे सर केली आहेत.



वाचा- आता जगाला कळणार उमरानचा वेग; टीम इंडियात निवडीनंतर वडील भावनिक, देशाचा...

‘बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर, ग्रुपच्या इतर सदस्यांनी परतीच्या वाटेवर हेलिकॉप्टर घेण्याचे ठरवले. परंतु रिदमने त्याच मार्गाने तिला खाली उतरण्याचा आग्रह धरला. म्हणून आम्ही चौघांनी आलो त्या मार्गाने शिखरावरुन खाली उतरण्याचा निर्णय घेतला. असे सहसा कधीच होत नाही. खूप कमी गिर्यारोहक विक्रम केल्यावर हेलिकॉप्टरने परततात. पण रिदमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही डोंगर उतरत खाली आलो’, असे उर्मी म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज