अ‍ॅपशहर

खेळाडूंची यशोगाथा अशीच सुरू राहावी

रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करतानाच भारताचे माजी फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ही यशोगाथा अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Maharashtra Times 29 Aug 2016, 5:55 am
रिओमधील खेळाडूंचे सचिनकडून कौतुक; कार भेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rio olympic player
खेळाडूंची यशोगाथा अशीच सुरू राहावी


वृत्तसंस्था, हैदराबाद

रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करतानाच भारताचे माजी फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ही यशोगाथा अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ऑलिंपिकमधील यशस्वी कामगिरीसाठी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना रविवारी सचिन यांच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी हा खूप सुंदर काळ आहे. आता कुठे हा प्रवास सुरू झाला आहे आणि तो इथेच थांबणार नाही, अशी मला खात्री आहे. आम्ही सर्वजण या प्रवासात तुमच्या सोबत आहोत आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही भविष्यातही आम्हाला यश साजरे करण्याच्या अनेक संधी द्याल,’ असे सचिन म्हणाले. गोपीचंद बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये हा सोहळा रंगला. या वेळी रिओ ऑलिंपिकचा सदिच्छादूत असलेल्या सचिन यांनी चौघांच्या हाती कारच्या चाव्या सुपूर्द केल्या. या प्रसंगी सचिनने गोपीचंद यांच्याविषयीही कौतुकोद्गार काढले. ‘गोपीचंद तुम्ही खरेखुरे आदर्श आहात. आम्हाला तुमचे कौतुक वाटते. देशाला अधिक पदके मिळवून देण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमच्यासह इतरही प्रशिक्षकांचे मी आभार मानू इच्छितो,’ असे सचिन म्हणाले.

‘येथे माझ्यासोबत उभ्या असलेल्या क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो,’ असे सचिन यांनी नमूद केले. तुम्ही ऑलिंपिकसाठी तयारी करताना अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. तुम्हाला अनेक पदार्थ खाण्याची परवानगी नव्हती, तुमचे लक्ष खेळावर केंद्रित व्हावे म्हणून तुमच्याकडून मोबाइल काढून घेण्यात आले होते. तुम्ही किती एकाग्र होता, हे मी रिओमध्ये पाहिले आहे. आता पुढील ऑलिंपिकमध्ये तुम्हाला या ब्राँझ आणि रौप्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदकामध्ये करायचे आहे, असेही सचिन यांनी या वेळी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज