अ‍ॅपशहर

सायना-ताय लढत

पॅरीसः भारताच्या सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला...

Maharashtra Times 26 Oct 2018, 4:00 am

पॅरीसः भारताच्या सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाची या फेरीत लढत होईल ती ताय झू यिंगशी. नुकत्याच झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तैपई तायने सायनावर मात करून जेतेपद मिळवले होते. दुसऱ्या फेरीत सायनाने जपानच्या नोझोमी ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१७ असा विजय मिळवला. श्रीकांतने कोरियाच्या ली डाँग केयूनला १२-२१, २१-१६, २१-१८ असे हरवले.

आयलीग आजपासून

नवी दिल्लीः भारताची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयलीगला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून (एआयएफएफ) देशातील फुटबॉल स्पर्धांच्या फेररचनेचे सूतोवाच करण्यात आल्याने आयलीगच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणाऱ्या स्पर्धेविषयी उत्सुकता आहे. कोईमतूरमधील नेहरू स्टेडियममध्ये शुक्रवारी इंडियन अॅरोज आणि चेन्नई सिटी एफसी या संघांमध्ये आयलीगची सलामीचा सामना होणार आहे. सहा महिने चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये दहा राज्यांमधील अकरा संघ सहभागी होणार आहेत. श्रीनगरमधील रियल काश्मीर एफसी हा नवा संघ या वर्षी आयलीगमध्ये पदार्पण करणार आहे.

भारताची कोरियावर मात

मस्कतः हरमनप्रीतसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर ४-१ने मात केली. या स्पर्धेत भारताने अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर दक्षिण कोरिया संघ चौदाव्या स्थानावर आहे. मध्यंतराला भारताकडे २-१ अशी आघाडी होती. भारतीय संघाचा हा गटातील पाचव्या सामन्यातील चौथा विजय ठरला. भारताने या स्पर्धेत ओमनवर ११-०, पाकिस्तानवर ३-१, जपानवर ९-० अशी मात केली. चौथ्या लढतीत भारताला मलेशियाने गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज