अ‍ॅपशहर

बजरंग, विनेश खेलरत्नच्या शर्यतीत

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट हे यंदाच्या राजीव गांधी राष्ट्रीय खेल रत्न पुरस्कारांसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बजरंगने भारतीय कुस्ती महासंघाकडून या पुरस्कारांसाठी अर्ज भरला आहे तर विनेशची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून होण्याची शक्यता, कुस्ती महासंघातील सूत्रांनी वर्तविली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2018, 5:18 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bajrang-vinesh

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट हे यंदाच्या राजीव गांधी राष्ट्रीय खेल रत्न पुरस्कारांसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बजरंगने भारतीय कुस्ती महासंघाकडून या पुरस्कारांसाठी अर्ज भरला आहे तर विनेशची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून होण्याची शक्यता, कुस्ती महासंघातील सूत्रांनी वर्तविली.

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कारांसाठी निवड समितीकडे नावांची शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी नमूद केले. दरवर्षी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी (राष्ट्रीय क्रीडा दिन) या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली जाते. मात्र, यंदा त्याचदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा आल्याने ही घोषणा लांबली आहे. आता येत्या २५ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

विराट, नीरजही दावेदार

विनेश आणि बजरंग दोघेही खेलरत्न पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही, असे भारतीय कुस्ती महासंघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर विनेश, बजरंग यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा हेही या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार असल्याचे क्रीडा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज